ज्ञानेश्वरी अध्याय पहिला – ओव्या १-६०

ओम् नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १॥

आद्या – सर्वांचे मूळ असणार्‍या, स्वसंवेद्या – स्वतःच स्वतःला जाणण्यास समर्थ असणार्‍या


देवा तूंचि गणेशु । सकल मतिप्रकाशु ।
म्हणे मी निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २॥

अवधारिजो जी – ऐका,


हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३॥

अशेष – संपूर्ण, वर्णवपु – (निर्दोष) वर्णरूपी शरीराचे सौंदर्य


स्मृति तेचि अवयव । देखा अंगिकभाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४॥

अष्टादश पुराणे । तीचि मणिभूषणे ।
पदपद्धती खेवणे । प्रमेयरत्नांची ॥ ५॥

मणिभूषणे – रत्नखचित अलंकार, पदपद्धती – शब्दांची छंदोबद्ध रचना खेवणे – कोंदणे


पदबंध नागर । तेचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्यवाणे । सपूर उजाळाचे ॥ ६॥

पदबंध – शब्दरचना, नागर – उच्च प्रतीची, रंगाथिले – रंगवलेले, अंबर – वस्त्र, साहित्यवाणे । सपूर उजाळाचे – शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत पोत आहे


देखा काव्यनाटका । जे निर्धारिता सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ॥ ७॥

क्षुद्रघंटिका – लहान घागर्‍या 
 

नाना प्रमेयांचि परी । निपुणपणे पाहता कुसरी ।
दिसती उचित पदे माझारी । रत्नें भली ॥ ८॥

तेथ व्यासादिकांच्या मति । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणे झळकती । पल्लवसडका ॥ ९॥

चोखाळपणे – निर्दोषपणे, पल्लवसडका – (मेखलेच्या)पदराच्या दशा


देखा षड्दर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ॥
म्हणऊनि विसंवादे धरिती । आयुधे हाती ॥ १०॥

विसंवादे धरिती । आयुधे हाती – एकमेकांशी न मिळणारी मते हीच जणू शस्त्रे


तरी तर्कु तोचि परशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकाचा ॥ ११ ॥

तर्कु तोचि परशु – कणादशास्त्ररुपी हातात अनुमानरुपी परशु
नीतिभेदु तोचि अंकुशु – गौतमीय न्यायदर्शनरुपी हातात तत्वभेद रुपी अंकुशु
वेदांतु – व्यासकृत वेदांतसूत्रे
 

एके हाति दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमत संकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥

एके हाती दंतु – पातंजलदर्शनरूपी हातात बौद्धमताचा खंडित झालेला दात


मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥ 

सत्कारवादु – निरीश्वरवादी सांख्यांचे तत्वज्ञान
धर्मप्रतिष्ठा – जैमिनिकृत धर्मसूत्रे
 

देखा विवेकमंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥ 

तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥

दशनु – दात, उन्मेषसुक्ष्मेक्षणु – ज्ञानरूपी बारीक डोळे असणारा


मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानी ।
बोधमदामृत मुनी । अलि सेविती ॥ १६ ॥

मीमांसा दोनी – पूर्व आणि उत्तर मीमांसा, बोधमदामृत – बोध हेच मदरूपी अमृत आहे,अलि – भुंगे


प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसे एकवटत । इभ मस्तकावरी ॥ १७ ॥

प्रमेयप्रवाल सुप्रभ – वर सांगितलेल्या शृतिस्मृत्यादिकां प्रतिपादिलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी आहेत.द्वैताद्वैत तेचि निकुंभ – द्वैत आणि अद्वैची मते ही गणपतीची गंडस्थळे आहेत.


उपरि दशोपनिषदे । जिये उदारे ज्ञानमकरंदे ।
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे। शोभती भली ॥ १८ ॥

दशोपनिषदे – ईशावास्य, कठ, केन, छांदोग्य, मुंडक, मांडुक्य, तैतिरिय, ऐतरिय, श्वेताश्वतर, बृहदारण्यक ही दहा उपनिषदे


अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारे ॥ १९ ॥

हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळले ।
ते मियां गुरूकृपा नमिले । आदिबीज ॥२० ॥

आता अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकला कामिनी ।
ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियां ।। २१ ।।

मज हृदयी सद्गुरू । तेणे तारिलो हा संसारपूरु ।
म्हणऊनि विशेष अत्यादरू । विवेकावरी ।। २२ ।।

जैसे डोळ्यां अंजन भेटे । मग दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहे तेथ प्रकटे । महानिधी ।। २३ ।।

दृष्टीसी फांटा फुटे – दृष्टी फाकते, महानिधी – (भूमिगत ) द्रव्याचा खजिना


का चिंतामणी जालया हाती । सदा विजयवृत्ति मनोरथी ।।
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ।। २४ ।।

म्हणोन जाणतेनो गुरू कीजे । तेणे कृतकार्य होईजे ।
जैसे मूळसिंचने सहजे । शाखापल्लव संतोषती ।। २५ ।।

मूळसिंचने – वृक्षाच्या मूळास पाणी घातले असता फांद्या पाने यांना टवटवी येते.


का तीर्थे जिये भुवनी । तिये घडती समुद्रावगहनी ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥२६ ॥

समुद्रावगहनी – समुद्रस्नानाने
 

तैसा पुढतपुढती तोची । मियां अभिवंदिला श्रीगुरूचि ।
जे अभिलषित मनोरुची । पुरविता तो ॥ २७ ॥

आता अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुका जन्मस्थान ॥
की अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥ २८ ॥

ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधी ।
नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥ २९ ॥

की परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजाता वसिष्ठ । अशेषांचे ॥ ३०॥

वसिष्ठ – श्रेष्ठ

ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार । शारदियेचे ॥ ३१॥

जिव्हार – जिव्हाळा

नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती ।
आविष्करोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२॥

म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥ ३३॥

गुरूवतीचा ठावो – मोठेपणाची सीमा, आवो – डौल

तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोवळीक । दुणावली ॥ ३४॥

शब्दश्री सच्छास्त्रिक – शब्दांच्या संपत्तीला शास्त्रीयता आली, महाबोधीं कोवळीक । दुणावली – ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली

एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले ।
आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥ ३५॥

प्रमेय रुचीस आले – तत्त्वांना गोडी आली, पोखले – पोसले,

माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भले ॥ ३६॥

एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।
म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७॥

आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥ ३८॥

नावेक – क्षणभर, बिक – विशेष सामर्थ्य

भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।
तैसे व्यासमती कवळले । अवघे विश्व ॥ ३९॥

धवळले – प्रकाशले

कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।
तैसे भारतीं सुरवाडले । अर्थजात ॥ ४०॥

भारतीं सुरवाडले । अर्थजात – महाभारतात चार पुरूषार्थ प्रफुल्लित झाले आहेत.

ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होइजे ।
तैसे व्यासोक्तितेजे । धवळित सकळ ॥ ४१॥

कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रकटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥ ४२॥

प्रथमवयसाकाळी – तारुण्यात पदार्पण करताना, अंगनाअंगी – स्त्रियांच्या ठिकाणी

ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे ।
आदिलापासोनि अपाडे । जियापरी ॥ ४३॥

उद्यानी माधवी घडे – उद्यानात वसंतऋतूचा प्रवेश घडतो, आदिलापासोनी अपाडे – अपूर्व, पूर्वीपेक्षा असाधारण

नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण ।
मग अलंकाती बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४॥

निवाडु – वेगळेपणा

तैसे व्यासोक्ती अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले ।
ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥ ४५॥

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनी आंगी ।
पुराणे आख्यानरूपे जगीं । भारता आली ॥ ४६॥

सानीव – लहानपणा

म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं ।
येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥

ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८॥

जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९॥

आता भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादिला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥ ५०॥

ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि ।
निवडिले निरवधि । नवनीत हे ।। ५१॥

शब्दब्रह्माब्धि – वेदरूपी समुद्राचे, निरवधि – अमर्याद

मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेके ।
पद आले परिपाकें । आमोदासी ॥ ५२॥

कडसिलें – विवेकाचा कढ देऊन

जे अपेक्षिजे विरक्ति । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ॥ ५३॥

जे आकर्णिजे भक्ती । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
ते भीष्मपर्वीं संगती । सांगीजैल ॥ ५४॥

जें भगवद्गीता म्हणीजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे।
जे सनकादिकीं सेविजे । आदरेसीं ॥ ५५॥

जैसे शारदियेचे चंद्रकळे-| । माजीं अमृतकण कोंवळे ।
तें वेंचती मवाळें । चकोरतलगें ॥ ५६॥

 
चकोरतलगे – चकोरांची पिले 

तियापरी श्रोतां। अनुभवावी हे कथा ।
अति हळुवारपणे चित्ता । आणूनियां ॥ ५७॥

हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८॥

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥ ५९॥

का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६०॥

 

There are no comments on this post

Leave a Reply