आपण सर्वच गाणी ऐकतो. पण चांगले गाणे म्हणजे काय याच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. काहींना एकदा ऐकल्यावर चाल आवडली तरच गाणे आवडते. शास्त्रीय गायनात गती असणाऱ्यांना त्यातल्या गमक, ताना, मुरक्या, राग, ताल वगैरे बारकावे समजले तर गाणे आवडते आणि वादनात गती असलेल्यांना आवडीचे वाद्य असलेली गाणी आवडतात. काहींना कविता भावली तर चाल तितकी आकर्षक नसली तरी गाणे आवडते. बहुतेकांना यापैकी एकापेक्षा जास्त कारणांसाठी गाणी आवडतात.
माझी हिंदी चित्रपटसंगीताची आवड राजकपूरचे चित्रपट आणि त्यातली गाणी यापासून सुरू झाली. साधारण १५ – १६ व्या वर्षी म्हणजे १९७५ च्या सुमारास पुण्यात रेडिओवर लागणारी गाणी आणि त्याकाळात मॅटिनीला स्वस्तात बघायला मिळणारे राजकपूरचे चित्रपट यामुळेच आमच्या बहुतेक मित्रांची गाणी ऐकण्याची, त्यावर चर्चा/वाद करण्याची सुरूवात होत असे. शंकर – जयकिशनच्या सहज, सोप्या चाली आणि शैलेंद्रचे मनाची पकड घेणारे काव्य यामुळे ती गाणी आवडणे नैसर्गिक होते असे वाटते. याच काळात अजूनही आठवणारी गोष्ट म्हणजे “रसरंग” मध्ये वाचलेला एक लेख. त्यात त्या काळी हयात असलेल्या मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, इंदीवर वगैरे गीतकारांवर ते वाईट गाणी लिहीत असल्याबद्दल टीका केली होती आणि त्यातले समारोपाचे वाक्य होते “सुरावटीबरहुकूम अर्थपूर्ण गीते लिहिणारा एकच गीतकार होऊन गेला, तो म्हणजे शैलेंद्र”. तेव्हापासून रेडिओवर गाणे ऐकताना शैलेंद्रचे गाणे कुठले आहे आणि ते खरेच अर्थपूर्ण आहे का हे पडताळून पाहण्याचा छंद लागला आणि लक्षात आले की ते वाक्य १००% खरे होते. खरे तर राजकपूरच्या चित्रपटांसाठी हसरत जयपुरी पण गाणी लिहायचा, पण ती सर्वच सुमार होती. त्यामुळे केवळ शैलेंद्रबद्दलच नाही तर इतर गीतकारांबद्दलही कुतूहल निर्माण झाले. त्यातून पुढे लक्षात आले की शैलेंद्र, शकील बदायुनी, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण, कमर जलालाबादी, भरत व्यास, प्रदीप, गुलजार, योगेश आणि नीरज हे हिंदी चित्रपटसंगीतातले प्रमुख गीतकार आहेत.
यातल्या प्रत्येकाबद्दल थोडक्यात सांगतो.
शैलेंद्र – हिंदी चित्रपटसंगीतामधला सर्वात परिपूर्ण गीतकार. एकदा चित्रपटगीतांचे माध्यम स्वीकारल्यावर आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान चित्रपटगीतांमधून मांडणारे कमालीचे पारदर्शी व्यक्तिमत्व. गुलजार म्हणतात “शैलेंद्रने चित्रपटगीतांना साहित्याचा दर्जा मिळवून दिला. “
शकील बदायुनी – भावनांचा आविष्कार अत्यंत प्रभावीपणे करणारा प्रतिभावंत गीतकार. त्यांच्या काळात फॅशनेबल असलेले समाजवादी किंवा कम्युनिस्ट छापाच्या कविता लिहिणे हे त्यांनी कधी केले नाही म्हणून त्यांचे चे नाव आदराने घेतले जात नाही. पण माझ्या मते शैलेंद्र आणि शकील हेच दोघे गीतकार असे आहेत की ज्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, विचार, भावना या त्यांच्या गीतांमधून स्वच्छ दिसतात.
साहिर लुधियानवी – संजोप रावांच्या ब्लॉगवर मी साहिरबद्दल बरेच काही लिहिले आहे. थोडक्यात सांगायचे तर हा मनुष्य मला “ओव्हररेटेड” वाटतो. जितके कौतुक झाले तितकी चांगली गाणी नाहीत. समाजवादी /कम्युनिस्ट असल्याने आणि “फैज अहमद फैज” यांची पोपटपंची केल्याने, उर्दू साहित्य आणि चित्रपटसृष्टी यात बरीच प्रसिद्धी मिळाली. गुलजार यांचे ” चित्रपटाच्या माध्यमाने साहिरला जितके स्वीकारले तितके साहिरने माध्यमाला स्वीकारले नाही” हे शब्द बरेच सांगून जातात.
मजरूह सुलतानपुरी – हा गीतकार नाही तर गाणी पाडणारा कारखाना आहे. १९४६ ते २००० इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीत किती गाणी लिहिली – याला सीमा नाही. जशी मागणी तसा पुरवठा. बरीच गाणी खराब ते अगदी खराब या प्रकारातली असली तरी याच्या चतुरस्त्र प्रतिभेची साक्ष देणारी असंख्य सुरेख गाणी अजूनही आठवतात म्हणून याचा समावेश यादीत केला नाहीतर आनंद बक्षीप्रमाणे दुर्लक्षच करावे लागले असते.
राजेंद्र कृष्ण आणि कमर जलालाबादी – हे दोघे निव्वळ शब्दजुळवे. चालीबरहुकूम गाणी लिहितायेतात इतकेच यांच्याबद्दल लिहिता येते. काव्य फारसे नसते.
भरत व्यास आणि प्रदीप – ही नावे जोडीने घेण्याचे कारण म्हणजे बहुतेक वेळा पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक चित्रपटात या दोघांनी गाणी लिहिली आहेत. भरत व्यास संस्कृतप्रचुर हिंदीत तर प्रदीप खड्या बोलीत गाणी लिहितात. मला दोघांमध्ये भरत व्यास जास्त आवडतात. पण खरे तर या दोघांपेक्षाही जास्त प्रतिभावंत गीतकार म्हणजे नरेंद्र शर्मा. अर्थात त्यांनी अतिशय कमी गाणी लिहिल्याने इथे उल्लेख केला नाही.
गुलजार आणि योगेश – दोघांचा एकत्र उल्लेख केला कारण दोघांनी साधारण १९६० च्या सुमारास चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दोघांमध्ये मला योगेश जास्त आवडतो. गाण्यातून तत्त्वज्ञान सांगण्याची शैलेंद्रची परंपरा त्याने पुढे चालू ठेवली (आठवा “आनंद” ची गाणी). अर्थात असा मनुष्य फार काळ चित्रपटसृष्टीच्या बदलत्या काळात टिकणे शक्य नव्हते, तसेच झाले. गुलजारांची प्रतिभा बहुआयामी आहे. उत्तम चित्रपट दिग्दर्शक, संवादलेखक आहेत. इतके की अजूनही त्यांनि लिहिलेले कित्येक संवाद तोंडपाठ आहेत. पण गीतकार म्हणून टिकून राहण्यासाठी मजरूह सुलतानपुरी प्रमाणेच असंख्य व्यावसयिक तडजोडी केल्या आहेत. “सत्या” मधले “गोली मार भेजेमें” गाणी त्याचा नमुना आहे. अर्थात “गँगमधला मनुष्य ‘दिले नादाँ तुझे हुआ क्या है ‘असे न म्हणता ‘गोली मार भेजेमें’ असेच म्हणणार हे त्यांचे म्हणणेही पटते.
नीरज – खरे तर गुलजार आणि योगेशबरोबरच यांचेही नाव घ्यायला हवे कारण त्यांनीही साधारण १९६० च्या सुमारास पदार्पण केले. पण त्या आधी हिंदी साहित्यात (नरेंद्र शर्मांप्रमाणेच) नाव कमावलेले असल्याने दबदबा होता (आणि आहे). इतका की “नई उमरकी नई फसल” चित्रपटातील सर्व गीते ही त्यांच्या कवितासंग्रहातल्या कविता आहेत. योगेश यांच्याप्रमाणेच व्यावसायिक तडजोड करण्याचा स्वभाव नसल्याने कारकीर्द अल्पजीवी ठरली.
प्रेम धवन – माझे रेटिंग शैलेंद्र – शकीलच्या खालचे पण राजेंद्र कृष्ण – कमर जलालाबादींपेक्षा वरचे आहे.
असो. प्रस्तावना बरीच भरकटली. लिहायला सुरूवात केली कारण संगीतकारांना कवितेची जाण किती असते (किंवा असते का?), त्याचा कवींच्या निवडीवर, कवितेच्या दर्जावर किती आणि कसा परिणाम होतो याबद्दल काही लिहायचे म्हणून. पण नंतर लक्षात आले की काही प्रमुख गीतकारांबद्दल जुजबी माहिती दिल्याशिवाय पुढचे विवेचन नीट करता येणार नाही. म्हणून इतके लिहिले. पुढच्या भागात कवी आणि संगीतकार या मूळ विषयावर लिहीन.
उत्सुकता वाढवणारा लेख. अर्थात लेखकाचा या विषयातला व्यासंग सर्वश्रुत आहेच.
एक निरिक्षण – कैफी आझमींचा उल्लेख कसा नाही?
श्री. संजीव
कैफी आजमींचे नाव कसे नाही हा आपला प्रश्न रास्त आहे. इंदीवर आणि कैफी या दोघांची नावे द्यावीत की नाही याबद्दल साशंक होतो. यात कैफींचा समावेश न करण्याचे कारण त्यांची एकूणच गाणी संख्येने कमी आहेत हे आहे. तीच गोष्ट नरेंद्र शर्मांची.
राजेंद्र कृष्ण आणि कमर जलालाबादी मला फारसे आवडत नसूनही त्यांची नावे घेतली कारण त्यांनी लिहिलेल्या गाण्यांची संख्या प्रचंड आहे. आनंद बक्षीमध्ये अजिबात दर्जा नाही, नुसती खोगीरभरती आहे.
इंदीवरने लिहिलेल्या गाण्यांची संख्याही मजरूह आणि आनंद बक्षींच्या खालोखाल भरेल. त्यातली रोशनकडे लिहिलेली २५ गाणी (मल्हार, शीशम, घर घर में दिवाली आणि अनोखी रात मधली) अत्युत्कृष्ट आहेत. पण कल्याणजी आनंदजीकडे लिहिलेली रडगाणी अजिबात आवडत नाहीत.