कवी आणि संगीतकार – २

पहिल्या भागाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे संगीतकाराला कवितेची जाण असते का, असल्यास त्याचा त्याने संगीत दिलेल्या गाण्यांवर परिणाम होतो का या विषयावर लिहायचे आहे. कित्येकांना हा उपद्व्याप निरर्थक वाटेल. एक तर गीतकाराला गाणे लिहिताना गाण्याची सिच्युएशन, संगीतकाराने आधीच बांधलेली चाल, वाद्यसंगीत धरून तीन मिनिटांची मर्यादा वगैरे बंधनात राहून गाणे लिहायचे असते वर ते निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार अशा सर्वांना पसंत पडले पाहिजे. इतके सगळे व्हेरिएबल्स असताना एकट्या संगीतकाराच्या काव्यविषयक मतांचा असा किती परिणाम होणार याबद्दल अनेकांना शंका असेल.

पण असा विचार करण्यामागे काय कारण आहे ते सोदाहरण सांगतो. मजरूह सुलतानपुरीचे उदाहरण घेऊ. त्याने १९४६ ते २००० या सुमारे ५५ वर्षात कमीतकमी ५००० (कदाचित १०, ००० पण) गाणी लिहिली असावीत अशी वदंता आहे. बहुतेक सर्व संगीतकारांबरोबर काम केले. पण त्याची चांगली गाणी शोधायची झाली तर अनिल बिस्वास (फरेब), नौशाद (अंदाज, साथी), रोशन (ममता, आरती, भीगी रात, दादी माँ, चाँदनी चौक), मदनमोहन (दस्तक), चित्रगुप्त (ऑपेरा हाऊस, काली टोपी लाल रुमाल)  अशी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संगीतकारांबरोबर केलेली गाणी आठवतात. राहुलदेव बर्मन आणि लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांच्याबरोबर केलेली अक्षरशः हजारो गाणी सुमार ते टाकाऊ अशी आहेत. हा फरक का दिसतो? काही लोक म्हणतील हा काळाचा महिमा आहे. तर सचिनदेव बर्मन, ओ. पी. नय्यर यांच्याबरोबर केलेली गाणी बघा. ती पण खास नाहीत. हे तर अनिल बिस्वास, रोशन, मदनमोहन वगैरेंना समकालीन आहेत ना? मग असा फरक का दिसतो?स्वतः मजरूह एके ठिकाणी म्हणाले होते “मी काम केलेल्या संगीतकारांपैकी फक्त रोशन आणि मदनमोहन यांनाच कवितेबद्दल आस्था होती”

गेली अनेक वर्षे यावर विचार केला आणि जी काही जुजबी माहिती उपलब्ध झाली त्यावरून पुढचे विवेचन केले आहे.  

संगीतकार एकूण तीन प्रकारचे असतात. १. प्रामुख्याने एकाच गीतकाराबरोबर काम करणारे, २. अनेक गीतकारांबरोबर काम करणारे पण बहुतेक वेळा चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या गीतकारांबरोबरच काम करणारे. ३. सतत नवीन कवी आणि कविता यांच्या शोधात असणारे

१. प्रामुख्याने एकाच गीतकाराबरोबर काम करणारे 

याची उदाहरणे म्हणजे नौशाद (शकील बदायुनी), शंकर – जयकिशन (शैलेंद्र – हसरत), सलील चौधरी (शैलेंद्र), सी. रामचंद्र (राजेंद्र कृष्ण). यापैकी नौशाद, शंकर – जयकिशन आणि सलील चौधरी यांनि संगीत दिलेल्या गाण्यात असंख्य चांगल्या कविता आढळतात तर सी. रामचंद्र यांच्या संगीतात आढळत नाहीत. पण माझ्या मते केवळ शैलेंद्र आणि शकील चांगले कवी असल्याने असे झाले आहे, त्यात संगीतकारांचा वाटा फारसा नाही.

नौशाद रागदारीवर आधारित संगीताबद्दल प्रसिद्ध आहेत. आपल्या चालीबद्दल इतके काटेकोर असतात की शकीलने लिहिलेले शब्द चालीत बसत नसतील तर त्यात हवा तो बदल करण्यासाठी एक वेगळा कवी पदरी बाळगला होता असे मध्यंतरी वाचले. यावरून कवितेबद्दलचा त्यांचा दृष्टीकोण लक्षात यावा.

स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा दुसरा संगीतकार म्हणजे सलील चौधरी. हिंदी चित्रपटात पदार्पण करायच्या आधीच त्यांनी निरनिराळ्या चाली तयार करून, त्यावर बंगाली भाषेत स्वतः गाणी लिहून ती स्वरबद्धही केली होती. शैलेंद्रचे (आणि तो गेल्यावर योगेशचे) काम इतकेच की त्याच चालीवर शब्द लिहायचे. ”ओ सजना बरखा बहार आई” ये बन्सी क्यूं गाये”, “मिला है किसीका झुमका” “हरियाला सावन ढोल बजाता आया” यांची मूळ बंगाली गाणी सलीलदा डॉट कॉम इथे ऐकायला मिळतील. अर्थात शैलेंद्र आणि योगेश हे मुळातच प्रतिभावंत कवी असल्याने अशा बंधनातही त्यांनी सुंदर गाणी लिहिली हा भाग वेगळा. योगेशने त्याची आणि सलील चौधरींची पहिली भेट कशी झाली याबद्दल एके ठिकाणी लिहिले होते ते उद्बोधक आहे. ” गीतकार शैलेंद्र माझे पितासमान गुरू. त्यांचे निधन हा खरे तर दुःखद प्रसंग, पण यामुळेच माझ्यासमोर संधी चालून आली. सलीलदांच्या पत्नीशी माझी थोडीशी ओळख होती. तिच्यातर्फे सलीलदांच्या भेटीचा योग आला. पहिल्या भेटीत सलीलदांनी एक चाल पेटीवर वाजवून आणि गुणगुणून दाखवली आणि यावर काही लिहिता आले तर लिही असे सांगून ते बाजारात मासळी आणायला गेले. चालीवर शब्द सुचेनात. थोड्या वेळाने चालच विसरलो. सलीलदांचे सहाय्यक कनू घोष यांना चाल परत वाजवून दाखवायची विनंती केली तर ते माझ्यावरच चिडले. चित्रपटात गाणी लिहायची महत्त्वाकांक्षा बाळगता आणि चाल कशी विसरता वगैरे बोलून बरेच झापले. अपमान सहन न झाल्याने मी घरी जायला निघालो, पण राग आवरून अर्ध्या वाटेवरून परत आलो. चाल वगैरे जाऊ दे, आपण नुसतीच कविता लिहू असा विचार करून एक कविता लिहिली. सलीलदा परत आले, त्यांनी गुणगुणून पाहिली आणि म्हणाले “अरे वा ! छान बसतेय की चालीत” अशा रीतिने मी सलीलदांबरोबर गाणी लिहायला लागलो.”  पुढे मल्याळी चित्रपटात संगीत देतानाही त्यांनी त्याच चाली वापरल्या. आपला हृदयनाथ हिंदी चित्रपटात गाणी देताना मराठी गाण्यांसाठी दिलेल्या चालीच परत वापरतो त्याची आठवण येते.

सी. रामचंद्र आधी कविता लिहून घेऊन मगच चाल बनवत असे एके ठिकाणी वाचले. इतका हास्यास्पद दावा दुसरा नाही. “मैं हूँ एक खलासी, मेरा नाम भीमपलासी”, “आना मेरी जान संडे के संडे”, “इना मिना डिका”, “मोंबासा मोंबासा”, “शोला जो भडके दिल मेरा धडके” यासारखी असंख्य गाणी कवींनी आधी लिहिली आणि मग अण्णांनी चाल लावली यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. राजेंद्र कृष्ण सुमार दर्जाचा गीतकार आहे, एक “अनारकली” मधली गाणी सोडली तर त्याची इतर गाणी अजिबात मनाला भावत नाहीत. “परछाई” मधले “कटते है दुख में ये दिन” (गीतकार – नूर लखनवी) किवा “शिनशिनाके बुबलाबू” मधले “तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए” (गीतकार – पी. एल. संतोषी) ही गाणी खरोखर अप्रतिम आहेत पण पण सी. रामचंद्रांच्या असंख्य गाण्यांत अशी गाणी शोधणे म्हणजे म्हणजे गवताच्या पेंढीत सुई शोधण्यासारखे आहे.

शंकर – जयकिशन पैकी शंकर हा शैलेंद्रबरोबर आणि जयकिशन हसरत बरोबर काम करायचा. शंकर – जयकिशन हे नौशाद, सलील चौधरींइतके चालीबद्दल काटेकोर नव्हते. सहज गुणगुणता येतील अशा सोप्या चाली लावण्याकडे कल असल्याने शैलेंद्रलाही जास्त स्वातंत्र्य मिळत असावे.

दुसऱ्या प्रकारच्या संगीतकारांबद्दल तिसऱ्या भागात लिहीन.

2 Responses

  1. हाही लेख आवडला, पण मजरुह यांना असे किरकोळीत काढणे पटले नाही.
    प्रतिभा आणि प्रयास या दोन्हींच्या संयोगातून उत्तम काव्य तयार होते. शैलेंद्रसारख्या उच्च प्रतिभावंताला फारसे प्रयास पडत नसावेत असे वाटते. पण इतर गीतकारांमध्ये कधी कधी त्यांच्या ‘आर्ट’ पेक्षा ‘क्राफ्ट’ अधिक प्रकर्षाने दिसते. असे असले तरी मजरुह यांच्या प्रतिभेला सरसकट सामान्य म्हणणे योग्य नाही असे मला वाटते. ‘हम है मता ए कूचा बाजार की तरह’ हे एकच गाणे त्यांच्यातल्या ‘शायर’ ची – गीतकाराची नव्हे – ओळख करुन देण्यास पुरेसे आहे असे वाटते.
    साहिर ओव्हररेटेड कवी होता हे लेखकाचे म्हणणे वाचून नवल वाटले. यावर खुद्द लेखकानेच माझ्या ब्लॊगवर इतके सुरेख लिहून ठेवले आहे, की मी त्यावर काही बोलणे बरे नव्हे!

  2. श्री. संजीव
    मजरूहला किरकोळीत काढलेले नाही. खरे तर मला मजरूहबद्दल प्रचंड आदर आहे. त्याच्या फक्त चांगल्याच गीतांचा विचार केला तर त्याचा क्रमांक खूपच वरचा लागेल. पण राहुलदेव बर्मन, लक्ष्मी – प्यारे, नंतर बप्पी लाहिरी (आठवा – डिस्को स्टेशन) यांच्याबरोबर केलेली गाणी बघता चांगली गाणी /एकूण गाणी हे प्रमाण किती पडते?
    मला मान्य आहे की हाच आक्षेप अगदी शैलेंद्रवरही घेतला जाऊ शकतो. “याहू चाहे मुझे कोई जंगली कहे”, “आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम है राजकुमार”, “लाल छडी मैदान खडी”वगैरे गाणी मला अजिबात आवडत नाहीत. पण ही सर्व गाणी विचारात घेऊनही चांगली गाणी/एकूण गाणी प्रमाण बरेच जास्त आहे. अर्थात शैलेंद्र २००० सालापर्यंत गाणी लिहीत राहिला असता तर काय झाले असते हा भाग वेगळा.
    साहिर – मला असे वाटते की एखाद्या कवीने साहित्यात नाव काढले असले तर गीतकारांच्या जगात बराच दबदबा राहतो. साहिर, कैफी, नरेंद्र शर्मा, नीरज ही त्याची उदाहरणे. उलट केवळ चित्रपटगीते लिहिणाऱ्या कवीला तितका मान मिळत नाही. शैलेंद्र, शकील, योगेश, गुलजार ही त्याची उदाहरणे. म्हणून मला दुसऱ्या प्रकारच्या कवींबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. अर्थात साहिरबद्दल जास्तच कडक भाषा वापरली का?
    मला वाटले की लिहिले त्यापेक्षा जास्त शब्दात लिहिले असते तर इतका घोळ झाला नसता.
    प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Leave a Reply