कवी आणि संगीतकार – ३

या भागात प्रामुख्याने अशा संगीतकारांबद्दल लिहायचे आहे ज्यांनी अनेक गीतकारांबरोबर काम केले पण असे गीतकार सुस्थापित होते. यात १. सचिनदेव बर्मन २. मदन मोहन ३. हेमंतकुमार ४. चित्रगुप्त व ५. ओ. पी. नय्यर ६. रवी यांचा समावेश करता येईल.

सचिनदेव बर्मन – यांचा मुख्य भर साहिर, मजरूह, शैलेंद्र आणि आनंद बक्षी या चार गीतकारांवर असला तरी इतरही अनेक गीतकारांबरोबर काम केले आहे. यांच्या संगीतात इतके वैविध्य आहे की कुठलाही एक गीतकार त्यासाठी योग्य आहे असे त्यांना वाटत नसावे. पण त्यांना कवितेची जाण होती, ते कवितेच्या दर्जाबद्दल आग्रही होते असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एक तर त्यांना हिंदी भाषाच नीट समजत नसे. देव आनंदच्या चित्रपटांसाठी प्रामुख्याने संगीत दिल्याने हलकी फुलकी गाणी दिली.

मदनमोहन – यांचा मुख्य भर राजेंद्र कृष्ण, मजरूह, कैफी आजमी आणि राजा मेहंदी अली खाँ यांच्यावर होता. मला जरी राजेंद्र कृष्णची गाणी आवडत नसली तरी बाकी तिघांनी मदनमोहनकडे सुंदर गाणी लिहिली आहेत. खरे तर कैफी आणि राजा मेहंदी अली खाँ चित्रपटसृष्टीत टिकून राहिले (विशेषतः १९६० नंतर) ते मदनमोहनच्या आधारावर असे म्हणावे लागेल. याशिवाय खुद्द मजरूह यांनीच मदनमोहन यांना कवितेची जाण असल्याचे सांगितले आहे.

हेमंतकुमार – यांच्याकडे असंख्य गीतकारांनी गाणी लिहिली. स्वतः हेमंतकुमार काही बोलले नसले तरी अनुपमा, कोहरा (दोन्ही कैफी), गर्ल फ्रेंड (साहिर), खामोशी (गुलजार), बीस साल बाद आणि साहिब बिबी और गुलाम (शकील), आनंदमठ (बंकिमचंद्र, “गीतगोविंद” वाले जयदेव, शैलेंद्र),  दुर्गेशनंदिनी, मिस मेरी (यातली राजेंद्र कृष्ण यांची गाणी मला आवडतात)  यामधली गाणी ऐकल्यावर यांना कवितेची जाण असावी असे वाटते.

चित्रगुप्त – यांचा भर प्रामुख्याने मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यावर असतो. एकूण काव्याचा दर्जा चांगला असतो.

रवी – साहिर आणि शकील यांनी जास्त गाणी लिहिली असली तरी इतरही असंख्य गीतकारांनी गाणी लिहिली. साहिरने लिहिलेली गाणी जरी प्रसिद्ध झाली असली तरी मला साहिरची जयदेव, रोशन, खय्याम यांची गाणी जास्त आवडतात. रवी स्वतःही गीतकार आहेत.

ओ. पी. नय्यर – माधव मोहोळकरांनी साहिरला प्रश्न विचारला होता “आपल्या चालीपेक्षा कवीच्या कवितेला जास्त महत्त्व देणारा संगीतकार कोण? ” त्यावर साहिरने एकच नाव सांगितले – ओ. पी. नय्यर. अर्थातच मला हे पटत नाही. साहिरने ओपीकरता अडीच चित्रपटांसाठी गाणी लिहिली. नया दौर, सोने की चिडीया आणि १२ बजे (मजरूह बरोबर). त्यातली सोने की चिडीया मधली गाणी चांगली आहेत. पण सचिनदेव बर्मन आणि जयदेव बरोबर भांडणे झाल्याने साहिरने त्यांची नावे गाळली का? रोशन, खय्याम यांची का घेतली नाहीत हे प्रश्न मला सुटले नाहीत. त्याचा मुख्य भर साहिर, मजरूह आणि एस. एच. बिहारी यांच्यावर असतो. ओपी स्वतः असे म्हणतो की मी कुठल्याही मोठ्या गीतकारावाचून अडून बसत नाही आणि गीतकारांना नवीन कल्पना लिहिण्यासाठी उद्युक्त करतो. अर्थात ओपीच्या गाण्यातले काव्य बघता साहिर आणि ओपी दोघांवरही विश्वास बसत नाही.

There are no comments on this post

Leave a Reply