संगीतकारांची विभागणी तीन प्रकारात करता येते असे पूर्वी लिहिले आहे भाग २ व ३ मध्ये त्यापैकी दोन प्रकारच्या संगीतकारांची उदाहरणे दिली. माझ्या मते सर्वात महत्त्वाचा संगीतकारांचा प्रकार तिसरा. यातले संगीतकार प्रस्थापित गीतकारांबरोबरच इतर अप्रसिद्ध गीतकारांबरोबरही काम करतात. माझ्या मते असे संगीतकार फक्त तीन. १. अनिल बिस्वास २. रोशन. ३. जयदेव.
या तिघांबद्दल थोडासा अभ्यास केला असल्याने त्याबद्दल काही ठोस बोलू शकतो.
अनिल बिस्वास
असामान्य प्रतिभेचे संगीतकार. विशेषतः लताचा आवाज जसा त्यांच्या गाण्यात “लागतो” तसा अन्य कुठल्याही संगीतकाराच्या गाण्यात लागत नाही असे जाणकार म्हणतात. अर्थात संगीताबद्दल काहीच समजत नसल्याने त्याबद्दल काही लिहू शकत नाही. पण एके ठिकाणी त्यांनी “In my music poetry is the queen” असे म्हटले होते. या लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले दहा – बारा आणि ज्यांची नावे राहून गेली असे इंदीवर, कैफी आजमी, राजा मेहंदी अली खाँ, असद भोपाली, एस. एच. बिहारी असे आणखी ८ – १० गीतकार धरले तर २० – २५ गीतकार हे प्रस्थापित गीतकार समजायला हरकत नाही. पहिल्या व दुसऱ्या भागात वर्णन केलेल्या संगीतकारांची मजल या लोकांपलिकडे जात नाही. अनिल, रोशन आणि जयदेव यांनी मात्र यापेक्षा कितीतरी जास्त गीतकारांबरोबर काम केले आहे.
पहिल्याने अनिल बिस्वास यांच्याबद्दल बघू. अनिल बिस्वास म्हटले की प्रेम धवन यांचे नाव समोर येते. ते खरे आहे. बऱ्याच चित्रपटात प्रेम धवन यांनी गाणी लिहिली आहेत. पण किती गीतकारांबरोबर त्यांनी काम केले याची थोडी कल्पना यावी म्हणून काही आकडेवारी देतो. लता मंगेशकरांनी १९४८ मध्ये अनिल बिस्वास यांच्या “अनोखा प्यार” आणि “गजरे” या चित्रपटात प्रथम गाणी गायली तेव्हापासून १९६५ साली आलेल्या “छोटी छोटी बाते” या अनिलदांच्या शेवटच्या चित्रपटांपर्यंत मोजणी केली. एकूण ३४ चित्रपटांसाठी तब्बल ४२ गीतकार! अजूनही १९३५ मधल्या “धरम की बेटी” पासून १९४८ पर्यंतच्या चित्रपटांची मोजणी आम्ही करतच आहोत. यात वर सांगितलेल्या २० – २५ प्रस्थापितांपैकी बरेच आहेत तसे इतर अप्रसिद्ध गीतकारही खूप आहेत. गुलजार, नीरज, योगेश अर्थातच नाहीत पण मजेची गोष्ट म्हणजे इंदीवर आणि आनंद बक्षी आहेत. इंदीवर यांनी लिहिलेली दोन सुंदर गाणी प्रसिद्ध आहेत. एक “दिल शाम से डूबा जाता है (आशा – संस्कार) आणि दुसरे “जीवन है मधुबन (तलत – जासूस).
आकड्यांचे महत्त्व लक्षात यायला तुलना म्हणून सांगतो शंकर – जयकिशन यांनी शैलेंद्र – हसरत जोडीबरोबर १२५ चित्रपट केले. नौशाद यांनी १९४६ सालच्या “दर्द”पासून १९७१ मध्ये शकीलचे निधन होईपर्यंत फक्त त्यांच्याच बरोबर काम केले अपवाद अंदाज, साथी (दोन्ही मजरूह) आणि साज और आवाज (खुमार बारा बंकवी). सचिनदेव बर्मन यांची ख्याती संगीताच्या गरजेनुसार गीतकार बदलणारे अशी आहे, त्यांनी सुद्धा ७५ चित्रपटांसाठी फक्त २५ गीतकारांबरोबर काम केले.
नुसत्या आकडेवारीपेक्षा काही गाणी आणि त्यांचे गीतकार अशी उदाहरणे देतो, उदाहरणे अर्थातच अप्रसिद्ध गीतकारांची आहेत. याद रखना चाँद तारों (लता – अनोखा प्यार -जिया सरहदी), बरस बरस बदली भी बिखर गयी (लता – गजरे – गोपालसिंग नेपाली), मन में नाचे मन की उमंगे (लता – बेकसूर – एहसान रिजवी), बेईमान तोरे नैनवा (तराना – लता – डी. एन. मधोक), तेरा खयाल दिल से मिटाया नहीं अभी (तलत – दो राहा – जोश मलीहाबादी), कह दो के मुहब्बत से टकराए जमाना (मान – लता – कैफ भोपाली), रामरस बरसे (सी. एच. आत्मा – महात्मा कबीर – चंद्रशेखर पांडे), झिलमिल सितारोंके तले आ मेरा दामन थाम ले (नाज – लता – सत्येंद्र), मुख से न बोलूँ (जालियनवाला बाग की ज्योती – तलत – लता – उद्धवकुमार),
मला असे वाटते की जे संगीतकार अनेक गीतकारांबरोबर काम करतात त्यांची गाणी सदा टवटवीत वाटतात. शकील – नौशाद, किंवा सी. रामचंद्र – राजेंद्र कृष्ण किंवा अगदी शैलेंद्र असूनही शंकर – जयकिशनची गाणी पुढे पुढे कंटाळवाणी होतात तसे अनिल, रोशन आणि जयदेवचे होत नाही.
असो या भागात अनिल आणि जयदेव बद्दल लिहून पुढच्या भागात रोशनबद्दल लिहून लेखमाला संपवायची असा बेत होता पण आता जयदेवसाठी एक आणि रोशनसाठी दुसरा असे दोन भाग लिहावे लागणार असे दिसते.