मागल्या भागात लिहिल्याप्रमाणे या भागात संगीतकार जयदेवच्या गाण्यांचा विचार करू. संगीतकार जयदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते “गाने में अगर कविता न हो तो वो सिर्फ एक चीज या खयाल बन जाता है और फिर उसका कुछ मतलब नहीं है” आणि खरोखर त्यांच्या संगीतामध्ये – चित्रपटात आणि गैरफिल्मी – कवितेचा प्रभाव चांगलाच दिसून येतो. संगीतकार जयदेव यांची गाणी ऐकल्याने अनेक नवीन कवींची ओळख झाली.
जयदेव खऱ्या अर्थाने दुर्दैवी संगीतकार म्हणता येतील कारण त्यांना संधी कमीच मिळाल्या. १९५५ मधल्या “जोरू का भाई” पासून सुरुवात केली तरी १९५५ ते १९७० या प्रदीर्घ काळात जोरू का भाई (गीतकार – साहिर, नरेंद्र शर्मा, विश्वामित्र आदिल), अंजलि(गीतकार – न्याय शर्मा) आणि समुंदरी डाकू(गीतकार – विश्वामित्र आदिल), हम दोनो (साहिर), मुझे जीने दो (साहिर), किनारे किनारे (न्याय शर्मा) आणि ”हमारे गम से मत खेलो” अशा फक्त सात चित्रपटांना संगीत द्यायची संधी मिळाली. “जोरू का भाई” साहिरने लिहिलेली “सुबह का इंतजार कौन करें ” या गाण्याची तलत आणि लता यांनी गायलेली टॅंडेम व्हर्जन्स सुरेख आहेत. तीच गोष्ट ”समुंदरी डाकू” मधल्या “दिल जवाँ है आरजू जवाँ” या विश्वामित्र आदिल यांनी लिहिलेल्या तलत आणि तलत- आशा यांनी गायलेल्या गाण्याच्या टँडेम व्हर्जन्सची.
गीतकार न्याय शर्मांनी “अंजली” चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यातले “किस किस को दीपक प्यार करे” हे एकच गीत मी ऐकले आहे. मात्र “किनारे किनारे” मध्ये त्यांनी “जब गमे इश्क सताता है तो हँस देता हूँ (मुकेश), “चले जा रहे है मुहब्बत के मारे किनारे किनारे” (मन्ना डे), “देख ली तेरी खुदाई बस मेरा जी भर गया” (तलत) आणि “हर आस अष्कबार है हर साँस बेकरार है” (लता) अशी एकाहून एक सरस गीते लिहिली आहेत. त्यानंतर “रेश्मा और शेरा” मधले अतिप्रसिद्ध अशा “तू चंदा मैं चाँदनी” या गाण्यामुळे गीतकार “बालकवी बैरागी” नावाचे एक चांगले कवी आहेत हे समजले. “प्रेम पर्बत” मधले जाँ निसार अख्तर यांनी लिहिलेले “ये दिल और उनकी निगाहोंके साये” हे गाणे किती सुरेख आहे हे ज्यांनी ऐकले आहे त्यांना वेगळे सांगायला नको. पहाडी धुन, संतूर, बासरी आणि जाँ निसारचे ”पहाडोंको चंचल किरन चूमती है, हवा हर नदी का बदन चूमती है….. लिपटते ये पेडोंसे बादल घनेरे, ये पल पल उजाले ये पल पल अंधेरे.. ” यासारखे चित्रदर्शी शब्द यातून एखाद्या हिल स्टेशनवरचा सूर्योदय जणू काय आपल्या नजरेसमोर उलगडतोय असा भास होतो. याच चित्रपटात सुप्रसिद्ध कवयित्री पद्मा सचदेव यांनी दोन गाणी लिहिली आहेत. “ये नीर कहाँ से बरसे बदरी कहाँसे आयी है” आणि “मेरा छोटासा देखो ये संसार है” ही लताने गायलेली गाणीही सुरेख आहेत. “परिणय”मधले शर्मा बंधूंनी गायलेले “सूरज की गर्मी से तपते हुए तन को मिल जाये तरूवर की छाया” हे गीतही प्रसिद्ध आहे(गीतकार – रामानंद शर्मा). ”दिन खाली खाली बर्तन है रात है जैसे अंधा कुँआ इन सूनी अंधेरी आंखोंमें आँसूकी जगह आता है धुआँ” हे गुलजार यांचे घरौंदा मधल्या “एक अकेला इस शहर में” या गाण्यातले शब्द कोण विसरेल? “कोई गाता मैं सो जाता” ही हरिवंशराय बचचन यांची संस्कृतप्रचुर हिंदीतली येसूदासने गायलेली रचनाही मला आवडते. “क्या कोई नयी बात नजर आती है हम में आईना हमें देख के हैरान सा क्यूं है? ” असा प्रश्न”सीनेमें जलन आँखोंमें तूफान सा क्यूँ है” या गाण्यातून शहरयार यांनी विचारला आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या शहरयार यांनी “गमन” मध्ये पहिल्याने गीते लिहिली. मखदूम मोहिउद्दिन हे जरी लैकिकार्थाने गीतकार नसले तरी त्यांच्या अनेक रचना चित्रपटात गीते म्हणून आल्या आहेत. “दो बदन प्यार की आग मे जल गये” (चा चा चा – रफी – आशा), “जानेवाले सिपाहीसे पूछो वो कहाँ जा राहा है” (उसने कहा था – मन्ना डे), “फिर छिडी बात बात फूलोंकी” (बाज़ार) ही गाणी प्रसिद्ध आहेत तसेच “गमन” मधले “रातभर आपकी याद आती रही” हे छाया गांगुलीने गायलेले गाणेही माझे अतिशय आवडते आहे. याशिवाय आणखी एका कवीबद्दल लिहिले नाही तर हा लेख अपूर्ण राहील. तो म्हणजे सुदर्शन फाकीर. “दूरियाँ” या एकाच चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. बाकी त्यांची गैरफिल्मी गाणी – खास करून जगजीत सिंगने गायलेले “ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो” तसेच बेगम अख्तरने गायलेली गाणी जास्त प्रसिद्ध आहेत. पण “दूरियाँ”मधले “जिंदगी मेरे घर आना” हे माझे अतिशय म्हणजे अतिशयच आवडते गीत आहे. सर्वच गीत टंकायचा मोह मुष्किलीने आवरून एकच कडवे इथे देतो.
मेरे घर का सीधासा इतना पता है
मेरा घर जो है चारो तरफ से खुला है
न दस्तक जरूरी न आवाज देना
मेरे घर का दरवाजा कोई नहीं है
है दीवारें गुम और छत भी नहीं है
कडी धूप है तो २
तेरे आँचल का साया चुराके जीना है जीना ज़िंदगी
मेरे घर आना ज़िंदगी
अनेक संतकवींच्या रचनाही जयदेवने लता, आशा, भीमसेन जोशी अशा लोकांकडून गाऊन घेऊन अजरामर केल्या आहे. “कौनो ठगवा नगरिया लूटल हो” (कबीर – आशा – अनकही), रघुवर तुमको मेरी लाज (तुलसीदास – भीमसेन – अनकही), हरी आओ हरी आओ (सूरदास – भीमसेन – अनकही), मैं जानू नाही (मीराबाई – लता – चांदग्रहण).
चित्रपटसंगीताव्यतिरिक्त जयदेव यांनी हिंदी- उर्दूमधील प्रसिद्ध रचना आशा भोसलेकडून गाऊन घेतल्या आहेत. “निराला”, महादेवी वर्मा, नरेंद्र शर्मा तसेच गालिब, वगैरे कवी शायरांच्या रचना त्यात आहेत. त्यातले “मन तुमुल कोलाहल कलय में मैं हृदय की बात रे” हे गाणे ऐकणे हा “आऊट ओफ वर्ल्ड” अनुभव आहे.
एखादे व्रत घेतल्यासारखा आयुष्यभर चांगल्या कवितांवर आधारित गाणी देणारा जयदेव ५ जानेवारी १९८७ ला गेला. अनेक तरूण मित्रमैत्रिणी मला विचारतात “काका तुम्हाला नवीन गाणी आवडतच नाहीत का? ” मी त्यांना सांगतो “माझ्यासाठी चांगले संगीत ५ जानेवारी १९८७ ला संपले.”
विनायक,
संपूर्ण लेखमाला आवडली पण जयदेववरील भाग सर्वाधिक आवडला. मला वाटतं, ह्याला कारण असे की तो इतर लेखांच्या मानाने विस्तृतपणे लिहिलेला आहे. पहिले चार भाग त्रोटक व त्यामुळे जरासे तुटक वाटतात. त्यांतही तुम्ही जरा जास्त लिहिलं असतं तर बहार आली असती. कदाचित जुनी हिंदी चित्रपट-गीतं हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे असेल की कितीही वाचलं तरीही मनाचं समाधान होत नाही. त्यात लेखन ललित व शैलीदार असेल तर दुधात साखर! ही लेखमाला अशीच चालू ठेवा. वाचायला मी व तुमच्या-माझ्यासारखे ह्या गाण्यांवर प्रेम करणारे अनेक वेडे पीर आहेतच.
ही लेखमाला अशीच चालू ठेवा. वाचायला मी व तुमच्या-माझ्यासारखे ह्या गाण्यांवर प्रेम करणारे अनेक वेडे पीर आहेतच.
असेच म्हणतो. अर्थात वैयक्तिक आवडीनिवडी आहेतच, उदा.“जिंदगी मेरे घर आना” हे मला विशेष आवडत नाही, तसेच “रेश्मा और शेरा” मधली गाणीही. पण इतर गाण्यांबाबत प्रश्नच नाही.
या निमित्ताने जालावर अशा प्रकारच्या मराठी लिखाणाची नोंद होत आहे, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे.